www.24taas.com, झी मीडिया, डर्बन
पहिल्या रंगतदार टेस्टनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकन टीम डर्बन टेस्टकरता सज्ज झालेत. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटने टीमची कसोटी पाहिली. त्यामुळे कॅप्टन धोनी डर्बन टेस्टकरता जुनी स्ट्रॅटजी वापरणार, की विजयासाठी नवे आराखडे तयार करणार याकडेच फॅन्सचं लक्षं लागलेलं आहे.
वर्ल्ड नंबर वन टेस्ट टीम दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच होमग्राऊंडवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने चांगली लढत दिली. मात्र, तीन फास्ट बॉलर आणि एक स्पेशलिस्ट स्पिनर घेऊन खेळण्याच्या प्लानिंगमुळे, धोनी ब्रिगेड अखेरच्या दिवशी अडचणीत सापडली होती. नेमक्या क्षणी फास्ट बॉलर्सनी केलेला अचूक मारा आणि आक्रमक फिल्डिंगमुळे टीम इंडियाला टेस्ट ड्रॉ करण्यात यश आलं. वन-डे सीरिज पराभवानंतर टेस्टमध्ये विजय साजरा करण्यास उत्सुक असलेल्या टीम इंडियाला अखेरच्या टेस्टमध्ये सर्वच फॉर्म्याटमध्ये दमदार कामगिरी करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकन पेस अॅटॅकच्या तोडीस तोड भारतीय बॉलर्सनीही कामगिरी केली आहे. ज्या पीचवर फिलांडर, स्टेन, त्सोत्सोबेसारखे फास्ट बॉलर्स अडखळत होते... त्या पीचवर धोनी ब्रिगेडच्या फास्ट बॉलर्सनी आफ्रिकन टीमच्या नाकी नऊ आणले. झहीर खानच्या टीममध्ये परतण्याने तर भारतीय बॉलिंगची धार आणखीनच तिखट झाली आहे. त्यामुळे डर्बन टेस्टमध्येही इशांत, शमी आणि झहीर खान या वेगवान त्रिकुटाकडून तशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडियाच्या ओपनिंगचा अपवाद वगळता सर्वच पोझिशनवर भारतीय बॅट्समन चमकदार कामगिरी करतायत. शिखर धवन वन-डेपाठोपाठ पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये फ्लॉप झाला. मुरली विजय सावधपणे खेळत भारताला चांगली स्टार्ट करून देतो. मात्र, तो मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरतोय. राहुल द्रविडचा वारसदार म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराही टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. दिड शतकी खेळी करून आपण फॉर्मात परतल्याचं त्यानं दाखवून दिलं. सचिन तेंडुलकरने टेस्टमधून रिटारमेंट घेतल्यानंतर त्याच्या चौथ्या पोझिशनवर खेळायला आलेल्या विराट कोहलीनेही आपण जबाबदारी पेलण्यास समर्थ असल्याचं सिद्ध केलं आहे.
पहिल्या टेस्टचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेला विराट कोहली चौथ्या पोझिशनवर दिमाखात बॅटिंग करतोय. रोहित शर्मा आणि कॅप्टन धोनीचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत असताना. मुंबईकर अजिंक्य रहाणेची मोक्याच्या क्षणी होणारी बॅटिंग टीम इंडियासाठी फायदेशीर ठरतेय. भारतीय बॉलिंगपुढे द. आफ्रिकन बॅट्समन पहिल्या टेस्टमध्ये चाचपडले. त्यामुळे तितक्याच मेहनतीने भारतीय बॉलर्सना सेकंड टेस्टमध्येही बॉलिंग करावी लागेल. मॉर्केलच्या दुखापतग्रस्त होण्याने द. आफ्रिकन बॉलिंगची धार कमी झाली आहे. मॉर्केलऐवजी अबॉटला टीममध्ये संधी देण्यात आली. डर्बन टेस्टपूर्वी सर्वांच्या नजरा खिळल्या असणार त्या कॅप्टन धोनीच्या निर्णयाकडे. पहिल्या टेस्टमध्ये एका स्पिनरसह उतरलेला धोनी सेकंड टेस्टमध्येही स्पिनरचीच निवड करणार, की पीचचं निरीक्षण केल्यानंतर चौथ्या फास्ट बॉलरची निवड करतो याचीच उत्सुकता सर्वांना असणार.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.