www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!
‘हे सर्वज्ञात आहे की मला कोचिंगमध्ये रस आहे. पण, भविष्यात काय होईल हे काळच ठरवेल. जर बीसीसीआयला असं वाटलं की, मी टीम इंडियाच्या कोच पदासाठी योग्य आहे तर मीसुद्धा ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे’ असं सौरव गांगुलीनं म्हटलंय. यासोबतच ‘दादा’ म्हणतोय की, ‘खेळाडूंचा विकास, त्यांचा फॉर्म आणि योग्यता यांच्यावर मी चांगलं लक्ष देऊ शकतो. या खेळात परतण्यासाठी माझ्यासाठी हा योग्य मार्ग असेल.’
एकेकाळी विदेशी कोचसाठी आग्रही असणाऱ्या गांगुलीला आता मात्र, एखाद्या भारतीयालाच ही संधी मिळायला हवी असं वाटतंय. सौरव गांगुली यानं जवळजवळ साडेचार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलाय. पण, आता पुन्हा त्याला या खेळात परतायचंय... टीम इंडियाची निळी जर्सी पुन्हा एकदा अंगावर चढवायचीय... भविष्यकाळात त्याला टीम इंडियाचा कोच बनायचंय. आत्तापर्यंतच्या भारतीय कॅप्टनमध्ये सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या गांगुलीला वाटतंय की, कॅप्टनला पाठिंबा देणं हे कोचचं सर्वात महत्त्वाचं काम आहे.
भारतीय कोचचा मुद्दा अधोरेखित करताना गांगुलीनं लालचंद राजपूत यांचं उदाहरण दिलंय. ‘लालचंद राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आपण २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप आणि २००८ मध्ये सीबी सीरिज जिंकली, याची आठवण आपल्याला नक्कीच असायला हवी’ असंही गांगुलीनं म्हटलंय.