मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे. हॉल तिकीटावर चुकीचा तारीख टाकण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाची टीवाय बीकॉमची परीक्षा नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होतेय. म्हणून परीक्षेच हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरुन डाउनलोड करुन त्याची प्रत काढली. मात्र हॉल तिकीटावर २२ नोव्हेंबर ऐवजी परीक्षेची तारीख चक्क २१ ऑक्टोबर अशी टाकली गेली होती. दरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेली हॉल तिकीटं आपण दिलीच नसल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठानं केलंय. पण मग विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्रत्येक विद्यार्थ्याला हॉल तिकीट कसं मिळालं, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
परीक्षा विभागाचा असा अनागोंदी कारभार मुंबई विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर प्रश्न निर्माण करणारा आहे. विशेष म्हणजे कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख यांना परीक्षा नियंत्रक हे परीक्षा विभागाचं प्रमुखपद अजूनही भरता आलेलं नाही. परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी आत्तापर्यंत दोन फे-या झाल्यात, ज्यात १३ जणांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. पण कुलगुरुंना या पदासाठी एकही योग्य व्यक्ती सापडलेली नाही.
मुंबई विद्यापीठाचे परीक्षा विभागच नाही तर इतर यंत्रणाही सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. काही दिवसांपूर्वीच विद्यापीठात सिनेट सभा पार पडली. 11 वाजताची सिनेट अडीच वाजता सुरु झाली आणि तीन वाजता संपली. विद्यापीठाचा परस्पेक्टीव्ह प्लॅन मंजूर होण्याची शक्यता होती पण अर्ध्या तासात ते शक्य झाले नाही. इतकच काय तर कॉलेजांच्या फी वाढीची बैठक दोन वेळेला बोलवण्यात आली पण कुलगुरुंच्या अनुपस्थितीमुळे ती रद्दही करण्यात आली.