www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिक्षण हक्क कायद्यानुसार आता शाळांना वर्षाला १८० दिवसांऐवजी २२० दिवस करावे लागणार आहेत. त्यामुळं मात्र स्कूल बस असोसिएशन फी वाढवण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे शाळासुद्धा येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढवण्याच्या विचारात आहेत.
शाळांना पहिली ते पाचवीसाठी किमान २०० तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी २२० दिवस शालेय काम करणे बंधनकारक केले आहे. शिक्षण विभागाने काढलेल्या या नव्या नियमामुळे शाळांना आता पाचऐवजी सहा दिवसांचा आठवडा करावा लागणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांची साप्ताहिक सुट्टीदेखील कमी होणार आहे. मात्र या नियमाला शाळांनी विरोध केला आहे.
पहिली ते पाचवी शैक्षणिक ८०० तास आणि सहावी ते आठवीसाठी एक हजार तास शिकविण्याचा नियम शाळा पाळत असतील तर दिवसाचे बंधन घालू नका, अशी भूमिका शाळाचालकांनी घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्यात असलेल्या या तरतुदीचा सोयिस्कर अर्थ काढत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण निरीक्षकांमार्फत सर्व शाळांना परिपत्रक पाठवले आहे. या पत्रकानुसार पाचवीपर्यंत वार्षिक किमान २०० आणि सहावी ते आठवीसाठी २२० दिवस निश्चित केले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ