www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात असणारे हे वकील एकेकाळी कैदी होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.. मात्र हे खरं आहे.. १९९८च्या सुमारास भाऊबंदकीच्या वादात घडलेल्या हत्येच्या आरोपात त्यांना अटक झाली. या प्रकरणात मुख्य आरोपीसोबत असल्याने पोलिसांनी त्यांना सहआरोपी केलं.
स्वतःची बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.. मात्र आपल्यावरचा हा डाग पुसण्यासाठी वकील बनण्याचा निर्धार त्यांनी केला.. विविध जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतलं.. आधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून बीएची पदवी आणि नंतर एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं असून आता ते एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला आहेत,.. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे नोंदणी करुन त्यांनी सनद घेतली आणि ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात वकीली सुरु केलीय..
गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचं सुखदेव पांढरे यांनी सांगितलंय. कितीही आव्हानात्मक परिस्थिती असली तरी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर मात करणं सहज शक्य आहे हेच सुखदेव पांढरे यांनी दाखवून दिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>