www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्त्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका... राजकीय पक्षांना आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशोत्सवासारखी दुसरी चांगली संधी मिळणार नाही. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार सध्या सार्वजनिक गणेश मंडळांना भरघोस आर्थिक मदत देताना दिसत आहेत.
दहीहंडीचा जल्लोष असो, नाहीतर गणेशोत्सोवाचा हा उत्साह... राजकीय नेत्यांच्या सहभागाशिवाय हल्ली कार्य सिद्धीस जात नाही. काही अपवाद वगळले तर बहुतेक गणेश मंडळांना नेत्यांचा थोडाबहुत हातभार लागतोच. बाजारातील आर्थिक मंदीमुळं यावर्षी गणेश मंडळांकडं जाहिरातींचा ओघ कमी झालाय. गुटखा, पान मसाल्याच्या जाहिरातींमुळे या मंडळांच्या तिजोरीत भर पडायची. पण, गुटखा बंदीमुळं हे मार्ग बंद झाले. त्यामुळे मंडळांनी आपला मोर्चा राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे वळवलाय. २०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार करत आहेत.
राजकीय नेते या माध्यमातून जनसंपर्क वाढवून गणेश मंडळांची ‘व्होट बँक’ बांधत असले तरी अनेक गणेश मंडळं कुठल्याच राजकीय पक्षांना न दुखवता सर्वांकडूनच मदत स्वीकारताना दिसत आहेत. अशी संधी वारंवार येत नसल्याने गणेश मंडळ आपले आर्थिक हित साधताना दिसतात.
आर्थिक मंदी असली तरी राजकीय गणितांमुळं यंदा मंडळांची चांदी झालीय. राजकीय नेत्यांना मतांची जुळवणी केल्याचे समाधान मिळते, तर दुसरीकडं मंडळांची आर्थिक समीकरणंही जुळून येतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.