www.24taas.com, वृत्तसंस्था, अहमदाबाद
संपूर्ण देशभरात चर्चेत असमारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वत:च्या राज्यात तब्बल १४८ नरेंद्र मोदी आहेत. हे मोदी म्हणजे त्यांच्या थ्रीडी कॅम्पेनचा हिस्सा नव्हे तर ते प्रत्यक्षातील नागरिक आहेत.
मोदींच्या गुजरातमध्ये त्यांच्या नावाशी साधर्म्य असणारे तब्बल १४८ मोदी असून ते मोदींसारखा पेहराव करत नाहीत, ना त्यांच्यासारखी दाढी ठेवतात, मात्र त्यातील बहुतांश नागरिक मोदींचे समर्थक आहेत आणि आपल्या नेत्याला पंतप्रधान पदासाठी निवडून देण्यासाठी ते सर्व ३० एप्रिलची आतुरतेनं वाट पहात आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार अहमदाबाद इथं मोदी नावाचे सर्वात जास्त नागरिक असून तिथं २० ते ७० वयोगटातील तब्बल ४९ नरेंद्र मोदी आहेत. जरी ते सर्वसामान्य नागरिक असले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असलेल्या नामसाधर्म्यामुळं अनेक लोक त्यांना `सीएम साहेब` अथवा `मोदी साहेब` याच नावानं हाक मारतात.
मणीनगर इथल्या ४८ वर्षीय नरेंद्र दयाभाई मोदी टिंबर बाजार इथं काम करतात. ते सांगतात, माझ्या नावामुळं मला सरकारी अधिकाऱ्यांकडून मदत मिळणं सोपं होतं. लोक प्रेमानं मला `मोदी साहेब` किंवा `सीएम साहेब` याच नावानं हाक मारतात. मी नरेंद्र मोदींचा मोठा चाहता असून असून ते देशासाठी चांगले पंतप्रधान सिद्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदींशी नामसाधर्म्य असलेल्या अनेक नागरिकांनी खुद्द मोदींची प्रत्यक्षात भेट घेतली आहे. उस्मानपुरा इथं राहणारे फोटोग्राफर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री मोदींशी पंतग महोत्सवादरम्यान भेट झाली होती. माझं आणि त्यांचं नाव एकच आहे हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षकांना सांगून मला बोलावलं आणि माझी भेट घेतली, असं त्यांनी सांगितलं.
तर व्यवसायानं आर्किटेक्ट असणारे मोदी मुख्यमंत्र्यांशी आपला एक बंध असल्याचं मानतात. ते म्हणतात, मी इमारती बांधतो, तर मुख्यमंत्री मोदींनी संपूर्ण गुजरात उभं केलंय आणि पंतप्रधान बनून ते देशाला आणखी मजबूत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.