www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
विदर्भात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान १० एप्रिलला होतंय. यांत विदर्भातल्या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आपल्याला नागपूरच्या मतदारांचे समर्थन असून आपल्याला विजयाची खात्री असल्याचा दावा गडकरी यांनी केला. मुत्तेमवार यांना आपला पराभव अटळ असल्याचे समजल्याने त्यांचा संयम सुटल्याचा टोमणा गडकरी यांनी मारला. यावेळी गडकरींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
भाजपचे वर्ध्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी बी फॉर्म भरल्याने भाजपच्या गोटात गोंधळ निर्माण झालाय. वर्ध्यातून भाजपकडून रामदास तडस हे अधिकृत उमेदवार आहेत.. मात्र रामदास तडस यांच्यावर काही प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तडस यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते या शक्यतेमुळे वाघमारे यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जातंय.
तडस यांचा अर्ज रद्दबातल झाल्यास वाघमारे हे वर्ध्यातील भाजपचे उमेदवार असतील.. मात्र असं झाल्यास भाजपवर अधिकृत उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढाऊ शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. शिवसेनेकडून खासदार भावना गवळी यांनी शिवसेना, भाजप, रिपाई नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्या पाठोपाठ कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके उपस्थित होते.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासोबत चंद्रपूर-यवतमाळ या दोन जिल्ह्यातील भाजप-शिवसेना नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वर्ध्यातही काँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.. रामदास तडस यांच्याविरोधात आपणच विजयी होऊ असा दावा यावेळी सागर मेघे यांनी केला..
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडा-यात उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे उपस्थित होते. दसरा मैदान येथे राष्ट्रवादी पक्षा तर्फे जाहीर सभा घेण्यात आली होती…ह्या सभेत प्रफुल पटेलांनी आपले शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.