www.24taas.com, मुंबई
नाशिकमध्ये शिवसेनेची झालेली पिछेहाट यामुळे नाशिक जिल्हा आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या संदर्भातील निर्णय आज शिवसेनाभवनात घेण्यात आला. तसेच नाशिकचे महापौरपद हे भाजपसाठी सोडण्यात आल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे.
नाशिकमध्ये आता नवी फळी उभारण्यात येणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आज नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. यावेळी नाशिकच्या राजकीय परिस्थितीची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या दरम्यान, पक्षाची पिछेहाट झाली. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी जिल्हा आणि शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तसेच, नाशिकच्या महापौरपदाच्या शर्यतीत आता शिवसेना भाजपला सर्व मदत करणार असल्याचेही या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने मुंबईत महापौरपदाची मागणी केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये बहूमत नसताना सेनेने भाजपला महापौरपद देण्याची चांगलीच खेळी केली आहे.