राज भेटीने भाजपचे परप्रांतीय मारहाणीला समर्थन - आर आर पाटील

भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी टीका केली आहे. मनसेसोबत हातमिळवणी करणा-या भाजपचे परप्रांतीय मारहाणीला समर्थन आहे का? असा सवाल केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2014, 09:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी टीका केली आहे. मनसेसोबत हातमिळवणी करणा-या भाजपचे परप्रांतीय मारहाणीला समर्थन आहे का? असा सवाल केलाय.
सत्तेसाठी वाट्टेल ते करायची भाजपची तयारी असल्याचा आरोप आर. आर. पाटील यांनी केलाय. त्यामुळे भाजप आता काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांचे वोट कार्ड पुढे केल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा प्रस्ताव भाजप नेते नितीन गडकरींनी दिला होता. मात्र हा प्रस्ताव राज ठाकरेंनी अमान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं आता मनसे लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळं महायुतीमध्ये महाभारत सुरू झालंय. मनसेने आगामी लोकसभा निवडणूक लढवू नये, असा प्रस्ताव नितीन गडकरींनी राज यांच्यापुढं मांडला होता. मात्र या भेटीमुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाल्यानं महायुतीत अस्वस्थता पसरलीय. ही भेट शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, महायुतीला मनसेची गरज नसल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनं व्यक्त केलीय.

काँग्रेसविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठीच गडकरींनी राज ठाकरेंपुढं निवडणूक न लढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंचं म्हणणं आहे. तर दुसरीकडं मनसेची उमेदवार यादी तयार असल्याचे संकेत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी दिलेत.

मात्र लोकसभा निवडणूक न लढवण्याचा गडकरींचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पदाधिका-यांशी होणा-या चर्चेनंतर निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. आता राज ठाकरे अधिकृतपणे मनसेची भूमिका कधी जाहीर करतायत, याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.