www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा/नवी मुंबई
शुक्रवारी महायुतीची बुलडाणा तर मनसेची नवी मुंबईत प्रचार सभा झाली. यावेळी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर पलटवार करणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र `राज` हा विषयच सपशेल बाजुला सारला... आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर मनसोक्त टीका केली. इकडे, नवी मुंबईत राज यांनीही काँग्रेसचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार संजीव नाईक यांच्यावर नाव घेऊन टीका केली पण, उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेबद्दल चक्कार शब्दही काढला नाही.
'औकाद' आणि 'बाळासाहेबांसाठी पाठवलेलं सूप' जाहीर भाषणात काढल्यामुळे ठाकरे बंधुंवर विरोधकांसहीत अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी 'स्वल्पविराम' देत असल्याचं सांगत पुढचा वाद टाळला होता.
काय म्हटलं उद्धव ठाकरेंनी बुलडाण्यातील सभेत...
बुलडाण्यात महायुतीची जाहीर प्रचार सभा शुक्रवारी पार पडली. यावेळ, गोपीनाथ मुंडे यांनीही मतदारांना महायुतीलाच मतदान करण्याचं आवाहन केलं. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साद घातली. प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा बोलावण्यात आली होती.
यावेळी, सोनिया गांधी आणि शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी तोफ डागली. सोनिया मतांसाठी इमामांना भेटतात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. तसंच सत्तेत आल्यास जालना-खामगाव रेल्वेमार्ग करण्याची घोषणादेखील त्यांनी करून टाकली.
काय म्हटलं राज ठाकरेंनी नवी मुंबईतील सभेत...
शुक्रवारी, ठाण्यातील मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा बोलावण्यात आली होती. यावेळी, राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरच स्तुतीसुमनं उधळली. यावेळी राज ठाकरेंनी ठाण्याचे सद्य खासदार संजीव नाईक यांच्यावर थेट टीकाही केली.
`काय केलं या संजीव नाईकने... किती प्रश्न विचारले संसदेत? यांना सगळी पदं घरातच पाहिजेत` असं म्हणत राज ठाकरेंनी नाईकांवर थेट टीका केली. यावेळी, `राज ठाकरेचा नातेवाईक असलेला मनसेचा एक तरी उमेदवार दाखवा, तुमच्यातलेच उमेदवार निवडणार` असं म्हणतानाच मराठीचा मुद्दा उगाळला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.