www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी महाष्ट्रात हे शिवसेना-भाजप आघाडीचे असेल. मात्र, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘एनडीए’च्या बैठकीनिमित्त उद्धव ठाकरे राजधानीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
महाराष्ट्रातील जागावाटपाचे सूत्र जसे लोकसभेला कायम राहिले तसे ते विधानसभेलाही कायम राहील, त्यात कोणताही बदल होणार नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कोणीही काही वक्तव्य केली असली तरी आमची चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत होते. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात बदल होणार नाही. शिवसेनेपुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा ही स्वाभाविक भावना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आता राज्यात पावसाचे दिवस आले आहेत, नाही तर संपूर्ण राज्यात आत्ताच निवडणुका घ्यायला हव्या होत्या असं मत उद्धव ठाकरेंनी दिल्लीत व्यक्त केलंय. जैतापूरवर शिवसेनेची भूमिका ठाम आहे. तो देशात इतर कुठेही व्हावा असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्रात शिवसेनेसाठी मंत्रिपदाची चर्चा अजून झालेली नाही. २६ तारखेला शिवसेनेचा कोणताही खासदार मंत्री शपथ घेणार नाही असं उद्धव म्हणाले.
जैतापूरमध्ये होऊ घातलेला अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायमच आहे. जैतापूरचा हा प्रकल्प सुरक्षित आणि चांगला आहे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी तो त्यांच्या राज्यात घेऊन जावा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतून भरमसाट कर गोळा करायचा आणि नंतर मुंबई-महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसायची हा दुर्दैवी पायंडा काँग्रेसच्या सरकारांनी पाडला होता. तो आता मोडून टाकू. गारपिटीच्या नुकसानभरपाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. गारपीटग्रस्त शेतकर्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचे खासदार सरकारकडे पाठपुरावा करतील. या शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठीही प्रयत्न करू. तसेच मुंबई-महाराष्ट्रातील रखडलेल्या वा नव्या प्रकल्पांना गती देऊ. मात्र, वेगळ्या विदर्भाबाबत आमचा विरोध कायम आहे. महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, ही भूमिका शिवसेनेची आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.