मेटेंना महायुतीत घेणार? सेना नेत्यांचा विरोध

शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना महायुतीसोबत घेऊ नये, असा शिवसेना नेत्यांचा कल असल्यानं आज मेटेंच्या मातोश्री भेटीचा आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातला सोहळा रद्द करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 27, 2014, 10:21 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना महायुतीसोबत घेऊ नये, असा शिवसेना नेत्यांचा कल असल्यानं आज मेटेंच्या मातोश्री भेटीचा आणि वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहातला सोहळा रद्द करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली.
विनायक मेटे महायुतीसोबत येण्यासाठी इच्छुक आहेत. त्याचसंदर्भात आज दिवसभर मातोश्रीवर खलबलं सुरु होती. यासंदर्भात शिवसेना नेत्यांची मतं उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली. पण विनायक मेटे यांनी याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्याबाबत केलेली आक्षेपार्ह विधानांमुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचे पडसाद आज बैठकीतही उमटले. म्हणूनच त्यांना सोबत घ्यायला शिवसेना नेत्यांनी कडाडून विरोध केला. तसंच मेटेंची मराठा आरक्षणाची भूमिका शिवसेनेच्या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत असल्याकडेही या बैठकीत लक्ष वेधण्यात आलं.
एकंदरीत बीडची राजकीय गणितं पाहता, विनायक मेटेंना महायुतीसोबत घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आग्रही असल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेच्या आजच्या दिवसभर चाललेल्या बैठकांमध्ये मेटेंना महायुतीसोबत घ्यायला विरोध झाला.आज रात्री उशिरा मुंडे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याप्रकरणी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता उद्या या मुद्द्यावर आणखी घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.