www.24taas.com, मुंबई
नवीन वर्षाला सुरुवात झालीय. प्रत्येकानं नवीन वर्षात करायच्या अशा काही गोष्टींची यादी केलीच असतील... ज्याला आपण संकल्प म्हणतो, असं संकल्प ‘सोडण्यासाठी’ बनवले गेले असतील. पण, तुम्हाला जर स्वत:ची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी असाल तर या काही गोष्टींसाठी मात्र नक्की वेळ काढाल...
तुम्हाला जर स्वास्थ्यपूर्ण जीवन जगायचं असेल तर या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. त्यासाठी खालील उपाय आजमावून पाहा. त्यामुळे तुमचा चेहराच नाही तर तुमचं मनही सुंदर आणि हसतंखेळतं राहण्यास मदत होईल.
अॅक्टिव्ह राहा
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण मशीन्स आणि गॅझेटसच्या एव्हढ आहारी गेलेलो आहोत की साध्या साध्या गोष्टींसाठीही आपल्याला स्वत:च्या शरीराला किंवा मेंदूला ताण द्यावा वाटत नाही. अशी सवय तुम्हालाही लागली असेल तर ती थांबवण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या शरीराला दररोज थोडा तरी ताण द्या. ज्यामुळे तुम्ही कार्यशील राहाल. म्हणजे अगदी साध्या गोष्टी जसं की, २-३ मजल्यांसाठी लिफ्टऐवजी जिना वापरा, जवळपासच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जात असाल तर गाडीऐवजी चालत जा, रात्री जेवल्यानंतर लगेच न झोपता थोड्यावेळ परिसरात फेरफटका मारा.
मद्यपान आणि धुम्रपान बंद करा
तुम्ही आत्तापर्यंत हे बऱ्याचदा ऐकलंच असेल... वेगवेगळ्या संदेशातून, जाहिरातींतून, काही सल्ले आणि काही सुविचार... पण, खरोखर हेच आपल्या भल्यासाठीच नाही का. तुम्ही आत्तापर्यंत या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असेल तर तुम्हीही कदाचित यामुळे होणाऱ्या रोगांचे पुढचे बळी ठरू शकता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे थांबा. त्यामुळे स्वत:च्या मनावर ताबा ठेवून स्वत:लाच आव्हान द्या... धोकादायक गोष्टींपासून दूर राहण्याचं...
साखर आणि मिठ योग्य प्रमाणातच घ्या
साखरेचं प्रमाण रक्तातील शर्करेचं प्रमाणावर परिणाम करतं तर इन्सुलिन तुमच्या आंतरिक रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करतं. हे फक्त मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीच लागू असतं असं बिलकूल नाही. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. त्यामुळ कोणतंही उत्पादन विकत घेताना त्यातील कॉर्न सिरप, ग्लुकोज आणि लॅक्टोजचं प्रमाण एकदा जरूर तपासून पाहा. जसं साखरेचं तसंच मिठाचंही... मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा तुमच्या रक्तदाबावर दिसून येतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहारात घेताना जरा सांभाळूनच...
शांत झोप घ्या...
तुमची कामं असतील, टार्गेट असतील, नातेसंबंध असतील... आणि या सर्वांसाठी तुम्हाला वेळ द्यायचाय. त्यासाठी तुम्ही तुमच्या झोपेचं खोबरं करून तुमचे डोळे ताणून धरत असाल तर थांबा... जवळजवळ ६० टक्के लोकांमध्ये विविध ७० झोपेचं विकार आढळून येतात. अर्थातच याचा परिणाम तुमच्या कामावर, प्रेरणेवर, एकाग्रतेवर आणि वजनावरदेखील दिसून येतो. एव्हढच नाही तर तुमच्या बुद्धीची तल्लखता आणि तुमच्या मूडवर देखील याचा कमालीचा ताण तुम्हालाच जाणवायला लागेल. त्यामुळे विविध कामांची आखणी करताना तुमच्या झोपेलादेखील महत्त्व द्या. तुमची टार्गेटस् तुम्हाला जास्त जवळ जाणवायला लागतील, हे निश्चित.
ताण-तणाव फेकून द्या
आपल्यातील अनेक जण अनेक कारणांनी आणि कामांमुळे सतत व्यस्त असतो, त्यामुळे नेहमी एक तणाव आणि दबाव आपल्याला स्वत:लाच जाणवत राहतो. पण, दररोजच्या कामांतही थोडा ताण-तणाव आपल्याला टाळता येणंही शक्य नसतं. आपल्या जगण्यातला आता तो एक अनिवार्य भाग झालाय. तसंच म्हणायचं झालं तर याच ताणामुळे आपण थोडे कार्यशीलही राहतो. पण, अतिरिक्त ताण-तणाव मात्र आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे रोज थोडावेळ तरी मेडिटेशन आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. स्वत:ला इतरांपासून वेगळं करून ठेवू नका. आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमंडळींसोबत काही वेळ मजेत घालवा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोला.