www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भव्य सभा सुरू आहेत. या सभेत मोदींनी आपल्या भाषणातून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केलीय.
सर्वप्रथम दिल्लीतल्या सभेला मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांचे मोदींनी आभार मानले. मोदी म्हणाले, की दिल्लीनं एवढी विराट सभा पाहिली नसेल.
दिल्लीमध्ये एवढी सरकार आहेत, की कळतच नाही. दिल्लीमध्ये एक आईचं, तर एक मुलाचं शासन आहे. दिल्लीत एकाचवेळी अनेक जण राज्य करतात. पण तरीही दिल्लीचा कोणी वाली नाहीय. संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष आपापले सरकार चालवत आहे. त्यांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नाही.
पंतप्रधान सरदार आहेत, पण `असरदार` आहेत. देशात सर्वात सुखी मुख्यमंत्री दिल्लीचे आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना रिबीन कापण्याशिवाय दुसरं काम नाही. त्यांना कोणतंच मंत्रालय पहावं लागत नाही. दिल्लीत बलात्काराच्या घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात मुलींनी रात्री लवकर घरी यावं.
पंतप्रधान सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी ओबामांसमोर देशाच्या गरीबीचं प्रदर्शन करुन भारताचं नाक कापलं, अशी टीका मोदींनी पंतप्रधानांवर केली. मात्र त्याचवेळी नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानांना "देहाती औरत" म्हणत भारताच्या पंतप्रधानांचा जो अपमान केला, त्याचा समाचारही मोदींनी घेतला.
देशाच्या पंतप्रधानांचा एवढा मोठा अपमान परदेशात केला जातोय, याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसचे नेताच असल्याचं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी पंतप्रधानांचा अपमान केलाय. काँग्रेसचे नेता पंतप्रधानांना नॉनसेन्स म्हणतात, तर मग इतर लोक का नाही बोलणार, असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत डॉ. मनमोहन सिंह बोलू शकतील की नाही याबाबत शंका आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते बोललेच नाहीयेत.
देशात भ्रष्टाचार ज्या उंचीवर पोचलाय, त्यामुळं देशातील युवा वर्गाच्या भविष्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यामुळं फक्त भारताच्या तिजोरीचंच नुकसान झालं नाही, तर देशाची अब्रु लुटल्यासारखं आहे, या शब्दात मोदींनी घोटाळ्यांवर टीका केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ