बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 11, 2017, 09:59 AM IST
बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड! title=

नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

बॉर्डरवर काम करणाऱ्या जवानांना कशाप्रकारे निकृष्ठ दर्जाचं जेवण आणि वागणूक दिली जाते, हे या व्हिडिओतून दिसून येतंय. पण, तेजबहादूरचं हे फेसबुक अकाऊंट कोण हाताळतंय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. 

तेज बहादूरचं फेसबुक अकाऊंट हाताळणारं दुसरं तिसरं कुणीही नसून त्यांची पत्नी आहे. तसं त्यांनी फेसबुक अकाऊंटवर जाहीरही केलंय. 

 

बीएसएफ अधिकाऱ्यांचा जवानावर 'हल्ला'

बीएसएफ अधिकाऱ्यांनी मात्र जवानानं केलेल्या आरोपांवर उत्तर द्यायचं सोडून बीएसएफ जवानावरच 'हल्ला' केलाय. अशा पद्धतीचं निकृष्ठ दर्जाचं जेवण जवानांना दिलं जातं याचे कुठले पुरावेच सापडले नसल्याचा दावा, बीएसएफ अधिकाऱ्यांनी केलाय. तेज बहादूरवरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप केलाय. 20 वर्षांच्या कार्यकाळात तेज बहादूरवर 4 वेळा कारवाई करण्यात आलीय. प्रमोशन न मिळाल्यानं ते नैराश्य अवस्थेत असल्याचं बीएसएफचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) एमडीएस मन यांनी म्हटलंय.

तेज बहादूर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर

स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या तो अर्ज मंजूरही झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असंही डीआयजींनी म्हटलंय. 

तेज बहादूर यांच्यावर दबाव

इतकंच नाही, तेज बहादूरवर सातत्याने दबाव येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ काढून टाकण्यासाठी दबाव वाढत आहेत. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर या जवानांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रशासनिक बेसवरून हटवून प्लंबरची ड्युटी लावण्यात आली आहे. बेस कॅम्पवरुन हेडक्वॉर्टरवर शिफ्ट केरण्यात आले आहे.

'नोकरी जाण्याची पर्वा नाही'

दरम्यान, 'इंडिया टुडे'शी बोलताना आपल्याला आपली नोकरी गमावण्याची पर्वा नाही... मी पोस्टवर काय परिस्थिती असते हेच दाखवण्याचा प्रयत्न केला... माझ्यामुळे जवानांना थोडा जरी फायदा होत असेल तर प्रसंगाशी दोन हात करायला मी तयार आहे, असं ते तेज बहादूर यांनी म्हटलंय.

'झी 24 तास'ची भूमिका

या संपूर्ण प्रकारात खुद्द गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आपण हा व्हिडिओ पाहिला असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. परंतु, बीएसएफ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं स्पष्टीकरण पुरेसं नाही. जवानानं केलेल्या आरोपांना उत्तर न देता त्याच्या 20 वर्षांच्या कार्यकाळावर आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित करणं, यातून केवळ या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न आणि बेजबाबदारपणा दिसून येतो. बीएसएफ प्रशासनानं जवानांना पोस्टिंगच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि अन्नाचा पुरवठा आणि वितरणाचे आकडे जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. 

(नोट : 'झी 24 तास' व्हिडिओची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही)