अहमदाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भेटीचे दोघांकडून खंडन होत असले तरी कॅमेऱ्यात दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राणे हे भाजपमध्ये जाणार या चर्चेत आता अधिक पारदर्शकता दिसत आहे.
नारायण राणे यांनी भेटीचे खंडन केल तरी पडद्यामागे काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. नारायण राणेंचं अहमदाबादला जाणे आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात दीड तास बंद दाराआड चर्चा होणे, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर होता. आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राणे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीस-राणे भेटीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर त्यांची अस्वस्थता अधिकच वाढल्याचंही बोललं जात होते. त्या पाठोपाठ, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला ते कंटाळलेत आणि भाजपच्या वाटेवर आहेत, अशी हवाही गेल्या महिन्यात झाली होती. पण, राणेंनी या चर्चा फेटाळल्या होत्या.
दरम्यान, ५ एप्रिलला त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेटही घेतली होती आणि आपण काँग्रेसमध्ये समाधानी असल्याचे स्पष्ट केले होते. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं सांगून त्यांनी या विषयावर पडदा पाडला होता. मात्र, राणे - फडणवीस भेटीमुळे राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झालेय. या भेटीनंतर राणे थेट सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.