केरळच्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग, १०२ जणांचा मृत्यू

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागलीय. पारावुर या गावात हे मंदिर आहे. 

Updated: Apr 10, 2016, 11:51 AM IST
केरळच्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग, १०२ जणांचा मृत्यू title=

तिरुअनंतपुरम : केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागलीय. पारावुर या गावात हे मंदिर आहे. 

पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागलीय. या भीषण आगीत आतापर्यंत १०२ जणांचा मृत्यू झाला असून २००हून अधिक लोक जखमी झाल्याचं समजतय. 

परोवूर उत्सवासाठी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. उत्सवासाठी फटाक्यांच्या आतशबाजीचे आयोजन करण्यात आले होते. हे पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फटाके ठेवलेल्या एका खोलीत पहाटे तीनच्या सुमारास मोठा स्फोट झाला, त्यामुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी त्यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केले असून घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जखमींना तिरुवनंतपुरम येथील त्रिवेंद्रम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

पुत्तिंगल देवीच्या मंदिरात उत्सव सुरु असल्यामुळे भाविकांनी इथं मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. या आगीत मंदिराच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक मृत्यू हे स्फोटामुळे झाले आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या १ किलोमीटरच्या परिसरातील खिडक्यांच्या काचाही या स्फोटामुळे फुटल्या. स्फोटाच्या आवाजाने अनेकांच्या कानांतून रक्तस्त्राव सुरू झाला.

एशियानेट वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश केरळच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत.