www.24taas.com , झी मीडिया, हरियाणा
देशात सामूहिक बलात्काराच्या अनेक घटना सध्या पुढं येत आहेत. महिलांच्या बाबतीत नेहमीच वादात येणाऱ्या हरियाणा राज्यातल्या चोटीकलासी गावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. मात्र एवढ्यावरच न थांबता मुलीच्या आईचीही नराधमांनी हत्या केली. हे कृत्य करणारे होते त्याच गावातल्या प्रभावशाली घराण्यांतील मुलं.
आपल्याच गावातील दलित समाजातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना दिल्लीपासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या हरियाणाच्या चोटीकलासी गावात घडली. आर्थिक आणि राजकीय ताकद असेल तर काहीही करता येतं, असा विचार करणाऱ्या हरियाणातील प्रभावशाली घराण्यांतील मुलांनी हे पाशवी कृत्य केलं. शिवाय दर दहा दिवसांनी बोलवेन तिथं यायचं आणि तक्रार करायची नाही असंही त्यांनी मुलीला धमकावलं.
यावर घाबरलेल्या मुलीनं तर काही केलं नाही. पण तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. गावातल्या मोठ्या घराण्यातल्या मुलांविरुद्ध कारवाई करतील, ते हे पोलीस कसले. त्यांनी कारवाई केलीच नाही. उलट मुलीच्या शाळेनं तिचं नाव शाळेतून काढून टाकलं. शिक्षणही बंद...
एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीत. तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली म्हणून मुलीच्या आईचं अपहरण करुन तिची हत्या केली. अखेर मुलीनं वडिलांसह गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
मग चोटीकलासी सोडून ते दोघं बाप-लेक करनाल इथं गेले. तिथल्या वरिष्ठ पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली. भुताना पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. प्रकरण कोर्टात गेलं मात्र मुलगी आणि तिच्या वडिलांना येणाऱ्या धमक्या वाढल्या. संरक्षण मिळावं म्हणून मुलीच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. सुप्रीम कोर्टाला नेमकं काय घडलंय?, याचा अंदाज येताच राज्य सरकारला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं.
ही नोटीस मिळाल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. मुलीवर सामूहिक बलात्कार झाला म्हणून साठ हजार रुपये आणि आईची हत्या झाली म्हणून ३.७५ लाख रुपये असे नुकसान भरपाईचे दोन चेक पीडित कुटुंबाला पाठवण्यात आले आहेत. अद्याप हे प्रकरण कोर्टात असून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पीडित कुटुंबाचा संघर्ष आजही सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.