नवी दिल्ली : स्वतंत्र भारतातलं सर्वात मोठं गुपित आता उघड होणं शक्य आहे. आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स मोदी सरकारनं आज सार्वजनिक केल्या.
सुभाषबाबूंच्या ११९व्या जयंतीनिमित्त सरकारनं हे पाऊल उचललंय. या व्यतिरिक्त दर महिन्याला २५ फाईल्स जाहीर केल्या जाणार आहेत. netajifiles.gov.in या वेबसाईटवर या फाईल्स बघता येतील.
नवी दिल्लीच्या नॅशनल अर्काईव्हमध्ये जाऊन त्यांनी या फाईल्सची पाहणी केली. त्यांच्यासोबत बोस यांचे वंशजही उपस्थित होते. बोस यांचा मृत्यू, त्यांची हिटलरसोबत भेट, रशियामध्ये केलेलं पलायन याबाबत अनेक गुप्त गोष्टी या फाईलींच्या माध्यमातून बाहेर येतील, अशी शक्यता आहे. आजवर गूढ राहिलेल्या सुभाषबाबूंच्या अनेक गोष्टी या निमित्तानं जगासमोर येणार आहेत.
दरम्यान, २७ डिसेंबर १९४५ च्या एका फाईल्समध्ये धक्कादायक माहिती समोर आलीये. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सुभाषबाबू युद्ध-गुन्हेगार असल्याचं म्हटल्याचं उघड झालंय. त्यांनी तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधीन क्लीमेंट एटली यांना लिहिलेल्या एका पत्रावरून हा उलगडा झालाय. रशियाच्या सीमेमध्ये प्रवेशाची परवानगी तत्कालिन हुकूमशाह स्टॅलिन यांनी दिली होती. त्याबाबतही नेहरूंनी नाराजी व्यक्त केलीये. रशियानं मित्र राष्ट्रांचा विश्वासघात केल्याचं नेहरूंनी या पत्रात लिहिल्याचं उघड झालंय.