www.24taas.com, नवी दिल्ली
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजप नितीन गडकरींच्या पाठिशी ठाम राहिला आहे. स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद यांची तुलना केल्याने गडकरींवर जोरदार टीका झाली. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी राजीनाम्याची मागणी गेली. मात्र, गडकरींवरील सर्व आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका घेत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.
नितीन गडकरींच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचा निर्वाळा भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीनंतर देण्यात आला आहे. पूर्ती कंपनीच्या संबंधित गडकरींवर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं.. एस गुरुमूर्ती यांनी या बैठकीत सर्व कागदपत्रं सादर करत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना गडकरींवरील सर्व आरोप कसे चुकीचे आहेत, याचं स्पष्टीकरण दिलं.
विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, अरूण जेटली, राजनाथ सिंह, अनंत कुमार यांच्यासह देशभरातील मात्तबर नेते या बैठकीला उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी मात्र या बैठकीला अनुपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी भाजपचे सर्व नेते नितीन गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
माझ्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे गडकरी यांच्या दिल्लीतील कार्यालयाने दिलेल्या माफिनाम्यात सांगितले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. मी त्यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याने मला खूप दुःख झाले आहे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा माझा जराही हेतू नव्हता. मी केलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या उल्लेखाने जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे गडकरी यांनी म्हटले आहे.