www.24taas.com, झी मीडिया ब्युरो, लुधियाणा
सोशल नेटवर्किंग साइटचा दुरपयोग असाही होऊ शकतो असे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. लुधियाणाच्या एका नवजात बालकाला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकद्वारे विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने त्याच्यासाठी तब्बल आठ लाख रुपये दिले आहे.
ही बातमी पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत नवजात बालकाला दिल्लीतून आपल्या ताब्यात घेतले आणि त्याच्या आईकडे सुपूर्द केले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला आजोबा फिरोज खान आणि त्याची मदत करण्याचा आरोपात नर्स सुनिता आणि गुरप्रीत सिंह आणि इरफान यांना अटक केले आहे.
चौकशीत मुलं विकणाऱ्या एका मोठ्या टोळीशी त्यांचा संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे फेसबुकच्या साहय्याने या कृत्याला तडीस नेत होते.
लुधियाणा येथील एका मुलीचे लग्न मेरठमध्ये झाले. ६ महिन्यांनंतर मुलीचा घटस्फोट झाला. ८ एप्रिलला त्या मुलीने एका बालकाला जन्म दिला. पण हॉस्पिटलची नर्स सुनिताने मुलाचा सौदा यापूर्वीच केला होता. ४५ हजारात आजोबांनी हा मुलगा विकला. त्यानंतर नर्स सुनिता आणि तीचा मित्र इरफानने हा मुलगा साडे तीन लाख रुपयांना गुरप्रीतला विकला. त्यानंतर गुरप्रीतने हा मुलगा विकण्यासाठी फेसबुकची मदत घेतली.
फेसबुकवर जाहिरात पाहून दिल्लीतील एक व्यापारी अमित याने हा मुलगा ८ लाख रुपयांना खरेदी केला. दरम्यानच्या काळात आईच्या दुधावर असणाऱ्या या मुलाला कावीळ झाले. व्यापारी दाम्पत्य त्याला गंगाराम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत.
तेथील नर्सने विचारले की मुलाची आई कुठे आहे. त्यावेळी सांगण्यात आले, की त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर हे सर्व प्रकरण समोर आहे.