लग्नाच्या १० दिवस अगोदरच 'सेल्फी' फॅडनं घेतला त्याचा जीव

लग्नाला केवळ १० दिवस उरले असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय... सेल्फीचं फॅड त्याच्या जीवावर उठलं. 

Updated: Jan 20, 2016, 05:19 PM IST
लग्नाच्या १० दिवस अगोदरच 'सेल्फी' फॅडनं घेतला त्याचा जीव  title=

जोधपूर : लग्नाला केवळ १० दिवस उरले असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय... सेल्फीचं फॅड त्याच्या जीवावर उठलं. 

या तरुणाचा नाव निखिल प्रजापति असं आहे. २३ वर्षांचा निखिल राजस्थानातील महरानगढ किल्ल्यावर फिरायला गेला होता. 
 
एका पोलीस अधिकाऱ्याननं दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी काढण्यासाठी अतिउत्साहीत निखिल किल्ल्याच्या बुरुजावर चढला होता. मित्रांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्नही केला पण त्यानं काही ऐकलं नाही... वरती चढल्यानंतर अचानक निखिलचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. 

अचानक घडलेल्या या अपघातामुळे भांबावलेल्या मित्रांनी घटनास्थळी जाऊन निखिलची मदत करण्याचा प्रयत्न केला पण एव्हाना उशीर झाला होता. निखिलचा जागीच मृत्यू झाला होता. 

निखिल एका इलेक्ट्रिक दुकानात काम करत होता... १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नासाठी त्यानं सुट्टीही घेतली होती.