www.24taas.com , झी मीडिया, इंदूर
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना अखेर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जोधपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या इंदूर इथल्या आश्रमातून त्यांना अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी आसाराम यांची दिवसभर ड्रामेबाजी सुरू होती. त्यांच्या समर्थकांनी दांडगाई करून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना रोखत इंदूर आश्रमातून बापूंना ताब्यात घेतलं.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स जोधपूर पोलिसांनी बजावलं होतं. पोलिसांनी दिलेली मुदत काल संपली. त्यामुळं अटकेच्या भीतीनं आसाराम बापू हे भोपाळहून रातोरात गाडीनं इंदोरच्या आश्रमात पोचले. मात्र, प्रकृतीअस्वास्थ्यामुळं ते इंदूर आश्रमात विश्रांती घेत आहेत, असं त्यांच्या मुलानं नारायण साई यांनी सांगितल्यानंतर जोधपूर पोलीस शनिवारी संध्याकाळी तिथं पोहोचले.
आसाराम वैद्यकीयदृष्ट्या चौकशीसाठी फिट असून चौकशीदरम्यान त्यांचा बचाव समाधानकारक नसल्याचं आढळल्यास त्यांना अटक केली जाईल, असं जोधपूरचे डीसीपी अजय लांबा यांनी चौकशीआधी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
तर आसाराम बापू यांच्या जोधपूर इथल्या आश्रमाबाहेर वार्तांकनासाठी गेलेले टीव्ही पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यावर आसाराम समर्थकांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली. यात दोघं जण जखमी झाले. या प्रकरणी एका महिलेसह एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
दरम्यान, आसाराम यांच्या अटकेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आसाराम यांच्यावर कारवाईसाठी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.