www.24taas.com, नवी दिल्ली
प्रचंड महागाईच्या या दिवसांत सहा महिने पगार न मिळाल्यानं किंगफिशर एअरलाइन्सच्या दिल्लीतील एका कर्मचार्यागच्या पत्नीनं आत्महत्या केली. याप्रकरणी विजय माल्ल्या यांना दोषी धरून त्यांना अटक करण्याची मागणी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
‘माल्ल्या यांच्याकडे अफाट पैसा आहे. ३५० कोटींच्या जहाजाचे ते मालक आहेत, फॅशन कॅलेंडर दरवर्षी छापतात आणि दारूच्या धंद्यातून पैसा कमावतात. आयपीएलचा संघ खरेदी करतात... त्या विजय माल्ल्यांकडे कर्मचार्यांंच्या पगारासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत? हे कसे शक्य आहे ’ असा प्रश्न विचारत जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी विजय मल्ल्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केलीय. हरयाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांना अशाच प्रकरणात तुरुंगात धाडलं गेलंय, तर मल्लांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, असं यादव यांनी म्हटलंय.
किंगफिशर कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं... सुश्मिता चक्रवर्ती यांनी गेल्या आठवड्यात आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘पतीचा पगार न झाल्यानं घर चालवणं कठीण होऊन बसल्याचं त्यांनी लिहलं होतं. तोट्याचा सामना करणारी खासगी एअरलाइन्स कंपनी किंगफिशर समोरील संकट वाढलंय, पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. लवकरात लवकर पगार देण्याची मागणी कर्मचाऱयांनी केली आहे. मुंबई एअरपोर्टवर किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. या कर्मचाऱयांचा मागील सहा महिन्यापासून पगार झालेला नाही.