www.24taas.com, वृत्तसंस्था, पणजी
आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल यांच्या अटकपूर्व जामीनावर गोव्याचं सेशन कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, तेजपाल कोर्टातून बाहेर आल्यावर त्यांच्या गाडीवर काळे झेंडे फेकण्यात आले. हे काळे झेंडे फेकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर विमानतळाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला.
तेजपालच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देण्यात येणार असल्याचं कोर्टाने जाहीर केलं तोपर्यंत तेजपाल यांना अटक करता येणार नसल्याचे निर्देशही कोर्टाने गोवा पोलिसांना दिले. तर तरूण तेजपाल यांच्या वकील गीता लुथरा यांनी युक्तीवाद केला. त्यांनी तेजपाल हे तपासात गोवा पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा करत अटक हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं.
आपल्या युक्तीवादमध्ये गीता लुथरा यांनी तरूण तेजपाल कोर्ट सांगेल तिथे राहायला तयार आहेत, पण त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा, अशी विनंती केली. कोर्टाला असं वाटत असेल की तेजपाल यांनी पोलीस तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यातच राहावं, तर त्यासाठीही तरूण तेजपाल तयार आहेत. कोर्ट सांगेल तिथे ते राहायला तयार आहेत, असे गीता लुथरा यांनी सांगितलं.
हे प्रकरण चर्चेत आल्यापासून पीडित महिलेशी स्वतः तेजपाल किंवा त्यांच्यावतीने कुणीही संपर्क केलेला नाही किंवा यापुढेही संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तसेच पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत तरूण तेजपाल आपला मोबाईल क्रमांक गोवा पोलिसांनाही देण्यासाठी तयार आहेत. असंही गीता लुथरा यांनी तेजपाल यांच्यावतीने कोर्टात सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ