देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?

 देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: May 14, 2016, 06:08 PM IST
देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात? title=
संग्रहित

नवी दिल्ली : देशात प्रेम विवाहाला अनेक ठिकाणी विरोध होतो. तर आंतरजातीय विवाहाची कल्पना करणे ही गोष्टी सोडाच. आज काळ बदलला असला तरी बहुतेक ठिकाणी अशी विवाहाला समाजात मान्यता मिळत नसल्याचे उदाहरण दिसून येत आहे. जरी असा विवाह केला तरी त्याला लगेच स्विकारलं जात नाही. असे असताना देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

या राज्यात आंतरजातीय विवाह

आजही जातीपातीचे राजकारण केले जाते. जातीच्या अभिमानापायी काही पालकांनी आपल्या पोटच्या मुलाचीच हत्या केल्याच्या 'ऑनर किलींग'च्या घटनाही ऐकल्या आहेत. देशात आंतरजातीय विवाह स्वीकारले जात नसले तरी देशात असं एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त आंतरजातीय विवाह होतात. हे राज्य आहे मिझोराम.

५ टक्के आंतरजातीय विवाह

'इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये भारतातील ३३ राज्यांसह तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश करण्यात आला होता. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारत फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात, मात्र त्यापैकी सर्वात जास्त आंतरजातीय विवाह मिझोराममध्ये होतात. येथे ५५ टक्के असेच विवाह झालेले आहेत.

देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात, आंतरजातीय लग्नांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पण मिझोराम हे राज्य त्याला अपवाद आहे. मिझोराममधील बहुसंख्य नागरिक हे ख्रिश्चनधर्मीय आहेत. तिथे तब्बल ५५ टक्के लग्न ही आंतरजातीय लग्न होतात.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

दुसऱ्या क्रमांकावर मेघालय हे राज्य आहे. येथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ४६ टक्के आहे. तर सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून ३८ टक्के प्रमाण आहे. ३५ टक्के आंतरजातीय विवाहांसह मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीरमध्ये होतात. ते चौथ्या आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे. आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.

सर्वाधिक स्वजातीय विवाह

स्वजातीय विवाह होण्याचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेशात होतात, हे समोर आलेय. तेथे ९९ टक्के नागरिक त्यांच्याच जातीतील व्यक्तीशी विवाह करतात. तर हिमाचल प्रदेश, छत्तीसगड व गोव्यातील ९८ टक्के विवाह ही स्वतजातीतच केले जातात. तर पंजाबमध्ये ९७ टक्के विवाह स्वजातीत होतात.