जयपूर : जमीन विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांची 56 इंचाची छाती शेतकरी सहा महिन्यात 5.6 इंचाची करून दाखवतील आणि आपली एक इंचही जमीन सोडणार नाहीत, असं राहुल गांधींनी अधिक आक्रमक होत म्हटलंय.
राहुल गांधींनी ललिल मोदीसोबतच्या संबंधांवरून वसुंधरा राजे सरकारलाही निशाण्यावर धरलंय. आयपीएलचा माजी बॉस सध्या लंडनमध्ये बसून राजस्थान सरकारला 'रिमोट'नं चालवतोय, असंही राहुल यांनी म्हटलंय. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी, मोदी सरकारनं भूमी अधिग्रहण विधेयकावर तीन वेळा अध्यादेश जारी केलाय पण यानंतरही संसदेत ते मंजूर होत नाहीय, असंही म्हटलंय.
पहिल्यांदाच एक असं सरकार आलंय जे विरोधकांची मदत करतंय. जेव्हाही त्यांना संधी मिळते तेव्हा ते काँग्रेसचीच मदत करतात. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते एकच अध्यादेश तीन वेळा जारी करतात. आम्ही संसदेत भूमी विधेयक मंजूर होऊ देणार नाही. तुम्ही पाहा, एक इंच जमीनही दिली जाणार नाही, असं राहुल गांधी म्हटलेत.
प्रचार दौऱ्यादरम्यान मोदींनी '56 इंचाची छाती' असा उल्लेख केला होता यावरच निशाणा साधत 'सहा महिन्यात ही 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होऊन जाईल... आणि कोण याला 5.6 इंच करेल, काँग्रेस पार्टी हे करेल... या देशाची जनता हे करेल... शेतकरी आणि मजूर हे करतील... तुम्ही पाहाच' असं राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.