नवी दिल्ली : आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. विमानाचा प्रवास आजच्या काळात जरी स्वस्त झाला असला तरी तो प्रत्येकाला परवडेलच असेल नाही. म्हणूनच हरियाणा राज्यातील एका निवृत्त इंजिनियरने हा अनुभव समाजातील वंचित घटकांना देण्याचा निश्चय केला. आता सर्वजण या विमानाची सफर करू शकतात... ती पण फक्त ६० रुपयांत.
हरियाणातील बहादुर चंद गुप्ता एअर इंडियातून अभियंता म्हणून निवृत्त झाले. ते एकदा त्यांच्या गावी गेले असता गावातील एका वृद्ध व्यक्तीने विमानात बसण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यक्तीला विमान दाखवण्याची प्रक्रिया फार कठीण होती. समाजातील अनेक लोकांसाठी विमानप्रवास म्हणजे दिवास्वप्नच आहे, याची जाणीव गुप्ता यांना झाली.
निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या मालकीची काही शेतजमीन विकली आणि एअरबस ए ३०० हे भंगारात काढलेले एक खरेखुरे विमान सहा लाख रुपयांना विकत घेतले. दिल्लीजवळच्या एका उपनगरात त्यांनी आपले विमान उभे केले. विमानाची सफर करण्याची इच्छा असणाऱ्यांना या विमानाचे ६० रुपये इतके तिकीट काढावे लागते. ज्यांना ते पैसे देणेही जमणार नसेल त्यांनी ही सेवा मोफत दिली जाते.
या विमानप्रवासाचा अनुभव खरा ठरावा यासाठी येणाऱ्या लोकांना खऱ्या विमानाप्रमाणे बोर्डिंग पास दिले जातात. विमानात बसल्यावर एका एअर हॉस्टेस सुरक्षेच्या सूचना देते. त्याचप्रमाणे लहान मुलांना काही खाद्यपदार्थही दिले जातात. विमानप्रवास संपल्यावर त्यांना बाहेर पडण्यासाठी आपातकालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या घसरगुंडीवरुन बाहेर काढले जाते.
इतक्या विमानाचा खर्च कसा परवडणार याची गुप्ता यांना काळजी होती. मात्र काही विमान कंपन्या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना या विमानात प्रशिक्षण देतात. या कामातून आलेले पैसे गुप्ता त्यांच्या विमानाला सुस्थितीत ठेवण्यासाठी वापरतात. हे पैसे गुप्ता यांना मिळत असले तरी त्यांची खरी कमाई म्हणजे त्यांच्या विमानातून प्रवास करणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आहे, असे गुप्ता सांगतात.