www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेद्वारे निवडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही तयार आहोत, असं अमेरिकेनं जाहीर केलंय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिका काम करणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. तेव्हा यावर उत्तर देताना परदेश विभागाची उपप्रवक्ता मेरी हर्फ यांनी `भारतीय जनता ज्याला निवडणार त्याच्यासोबत आम्ही काम करू` असं उत्तर दिलंय.
गेल्या गुरुवारी, गांधीनगरमध्ये अमेरिकन राजदूत नेन्सी पॉवेल आणि मोदी यांची भेट झाली. ही भेट म्हणजे भारतातील लोकसभा निडवणुकीपूर्वी भारतातील वरिष्ठ राजनैतिक नेतृत्वासोबत संपर्क करण्याचा अमेरिकेच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे, असं हर्फ यांनी म्हटलंय. व्हिजा नीतीमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
अमेरिकेनं मोदींशी अंतर कायम ठेवलंय, अशा बातम्यांना हर्फ यांनी धुडकावून लावलंय. `खरं म्हणजे, या बातम्या खोट्या आहेत. मुंबईत आमच्या वर्तमान महावाणिज्य दूत आणि पूर्वेतील वाणिज्य दूतांनी गुजरातचे मुख्यमंत्री मोदींची भेट घेतली. यामुळे मोदींशी अमेरिकेचं अंतर कायम आहे, असं म्हणता येणार नाही. तसंच व्हिजा प्रकरणांत आम्ही नेहमी सांगत आल्याप्रमाणे, जेव्हा कोणतीह व्यक्ती अमेरिकन व्हिजासाठी अर्ज करतो तेव्हा अमेरिकेच्या कायदा आणि नीतीनुसारच या अर्जाची समीक्षा होईल` असं हर्फ यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.