www.24aas.com, झी मीडिया, ओसावाटोमी
अमेरिकेच्या केन्सासमध्ये एक अजब-गजब घटना घडलीय. एका १९ वर्षीय तरुणीनं बाळाला जन्म दिला... आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी ती झोपेत होती. बाळाचा जन्म झालेला तिला कळलंही नाही.
केन्सासच्या ओसावाटोमीमध्ये राहणारी एबीगेल उनरू गेल्या १० डिसेंबरपासून तापानं फणफणली होती. तिला पहिल्यांदा थंडी वाजून आली पण, नवीन वर्षाच्या संध्याकाळी मात्र ती बेशुद्ध पडली. एबीगेलच्या आजीनं - कॅथरीननं तिला जवळच्याच रिजनल मेडिकल सेंटरमध्ये अॅडमिट केलं. स्वत:हून श्वास घ्यायलाही एबीगेलला शक्य होत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. यादरम्यान एबीगेल सात महिन्यांची गर्भवती होती.
मेडिकल तपासणीत एबीगेलच्या शरीरावर एच-१ एन-१ व्हायरसचं आक्रमण झाल्याचं समजलं. एबीगेल गर्भवती होती त्यामुळे डॉक्टरांनी तिचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी तिला औषधांच्या मदतीनं कोमामध्ये ठेवलं होतं. बार्बिचुरेट औषधांच्या साहाय्यानं कोमामध्ये असलेल्या एबीगेलनं एका स्वस्थ मुलाला जन्म दिला.
प्रसुतीनंतर दोन आठवड्यांनी ती शुद्धीत आली पण शारीरिक रुपात कमजोर आहे. हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रसुतीदरम्यान एबीगेल झोपेतच होती. पण कोणत्याही त्रासाविना तिनं बाळाला जन्म दिला. सिझेरियनचीही गरज तिला लागली नाही.
एबीगेल मात्र थोडी नाराज आहे. `मी माझ्या बाळाच्या जन्मानंतरची दोन आठवडे मिस केले. मी माझ्या बाळाच्या जन्माचा अनुभव गमावला` असं तिनं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.