www.24taas.com, इस्लामाबाद
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.
‘शाहरुख हा जन्मानं भारतीय आहे आणि तो नेहमीच भारतीय म्हणून राहणंच पसंत करेल. पण, मी भारत सरकारला आग्रहानं सांगू इच्छितो की शाहरुखला योग्य सुरक्षा पुरविली जावी. मी सगळ्या भारतीय बंधु-भगीनींना आग्रहानं सांगेन की, जे कुणी शाहरुखबद्दल नकारात्मक पद्धतीनं बोलत असतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तो एक सिनेस्टार आहे’ असं रेहमान मलिक यांनी म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी, 'न्यूयॉर्क टाइम्स' या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आलेल्या लेखात शाहरुखने आपण मुस्लिम असल्यामुळे राजकारण्यांसाठी अनोळखी वस्तू बनलो असल्याची भावना व्यक्त केली होती.
शाहरुख खान भारत आणि पाकिस्तानातील सगळ्यांचाच लाडका कलाकार असल्याचाही मलिक यांनी आवर्जुन उल्लेख केलाय. ‘मला विश्वास आहे की जे कुणीही शाहरुखबद्दल वाईट-साईट बोलत आहेत किंवा त्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपल्या धमक्या मागे घेतील. कलाकारांना सगळ्यांकडूनच प्रेम मिळायला हवं. लोक ते देतातही कारण ते एकात्मकतेचंच एक प्रतिक असतात’, असं रेहमान मलिक यांना वाटतं.