खोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!

पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी... खोट्या प्रतिष्ठेखातर या महिलेची मंगळवारी दगड मारून-मारून हत्या करण्यात आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरपासून जवळजवळ ८० किलोमीटर अंतरावर ननकाना साहिब इथं राहणारी फरजाना परवीन हिनं आपल्याच घराजवळील ४५ वर्षीय मोहम्मद इक्बाल याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी निकाह केला होता. आपल्या कुटुंबीयांच्या मर्जीविरोधात जाऊन तिनं हा निकाह केला होता.
यामुळे संतापलेल्या फरजानाच्या कुटुंबीयांनी मोहम्मदवर अपहरण आणि जबरदस्तीनं निकाह केल्याचा आरोप ठेवला. यासाठीच फरजाना मोहम्मदच्या म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या बचावासाठी हायकोर्टात आपला जबाब नोंदविण्यासाठी आली होती. तिथंच ही घटना घडली.
सुरुवातीला फरजानाच्या कुटुंबातील सदस्यांनी हवेत गोळीबार करून फरजानाला मोहम्मदपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर फरजानाच्या वडिलांनी आणि भावांसहीत तिच्या कुटुंबातील इतर जवळपास २० सदस्यांनी फरजाना आणि तिच्या नवऱ्यावर लाठी-काठ्यांनी आणि विटांनी हल्ला केला.
हायकोर्टाच्या बाहेरच घडत असलेला हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दीही जमा झाली होती. पोलीस अधिकारी नसीम भट यांनी ही माहिती दिली. लाहोर पोलीस प्रवक्ता नियाब हैदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरजानाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला मात्र मोहम्मद या हल्ल्यातून बचावला. फरजाना ही तीन महिन्यांची गर्भवती होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.