www.24taas.com, हिंदुकुश
आठवड्याभरात आज दुसऱ्यांदा हिंदुकुश प्रदेशात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे अफगाणिस्तानचा प्रदेश सर्वाधिक हादरला. या भूकंपाचे पडसाद जम्मू-काश्मिर भागावरही पडले. या भूकंपामुळे कुठलीही मोठ्या प्रमाणावर हानी न झाल्याचं सांगितलं जात आहे.
यापूर्वी १२ जुलै रोजी ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का हिंदूकुश भागात बसला होता. याचा परिणाम अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात जाणवला होता. काश्मिर खोऱ्यातही या भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे काश्मिरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
काश्मिर खोरं हा भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश मानण्यात येत आहे. भूकंपाच्या धोक्याबाबत जगात काश्मिरचा चौथा क्रमांक लागतो. ८ ऑक्टोबर २००५ रोजी काश्मिरमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. याचा परिणाम पाक व्याप्त काश्मिरवरही झाला होता.