चीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना तिकडे चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Updated: Oct 8, 2014, 08:01 PM IST
चीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते title=

रायगड : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना तिकडे चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

राहुल गांधी प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये ही सभा झाली, मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असतांना राहुल गांधी रणधुमाळीत उतरले आहेत.
 
पृथ्वीराज चव्हाणं कामं करतात
पृथ्वीराज चव्हाण हे कामं करणारे मुख्यमंत्री होते, ते मार्केटिंग करत नव्हते, मार्केटिंगपेक्षा त्यांनी कामांना अधिक महत्व दिलं असं सांगून, राहुल गांधी यांनी मिस्टर क्लिन समजल्या जाणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्र सर्वात पुढे

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सर्वात पुढे असल्याचा दावा केला आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र पुढे आहे, हे मोदी विसरले असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय, गुजरात विकासाचं मोदींनी आभासी चित्र तयार केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

 
राहुल गांधींची मोदींवर जोरदार हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या फायद्याचा जमीन अधिग्रहण कायदा बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. हा कायदा शेतकऱयांच्या जमीनी कुणी हाडपू नये, यासाठी यूपीएने बनवला होता, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेकडे बघून काँग्रेसलाच मतदान करण्याचं आवाहनही राहुल गांधींनी केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.