भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ. इथले आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत खासदारकी मिळवलीयं.
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्याने भंडारा जिल्ह्यातल्या या साकोली विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षातून जोरदार हालचालींना वेग आलाय. नाना पटोले भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार झालेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी पराभव केल्याने भाजपच्या गोटातील उत्साह इथे दामदुपटीने वाढलाय.
साकोली विधानसभा मतदारक्षेत्रात साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. इथली एकूण मतदारसंख्या सुमारे तीन लाखांच्या जवळपास आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांना १ लाख २२ हजार १६८ मते मिळाली. तर कॉंग्रेस चे उमेदवार सेवक वाघाये पाटील यांना ५९ हजार २५३ मते मिळाली.
विकासकामे...
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पुढाकार, शेतकऱ्यांचा धानाला योग्य भाव मिळावा याकरिता सरकारकडे पाठपुरावा, जिल्ह्यातील बुरड समाजाला मुख्य प्रवाहात आणले, मच्छिमारांना सबसिडीवर तलाव मिळवून दिले.,
अशी जनतेची कामे कामे केल्याचा दावा खासदार नाना पटोले यांनी केलाय.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष..
तीनवेळा आमदारपद मिळूनही नाना पटोले यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची टीका विरोधक करताहेत. दुष्काळाची झळ सोसत असलेली साकोलीतील सर्वसामान्य जनता वर्षानुवर्ष समस्यांनी बेजार आहे.
साकोलीतील समस्या -
यात युवकांना रोजगार नाही, मतदारसंघात मोठे उद्योग नाहीत, शेतक-यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष, लाखांदूर तालुक्याकडे दुर्लक्ष, सरकार दरबारी अनास्थेचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.
नेत्यांच्या राजकीय लढाईत अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होतंय, अशी खंत इथले नागरिक व्यक्त करताहेत. पटोले यांनी मतदारसंघात काही कामे केली असली तरी नागरिकांच्या त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नाना पटोले यांना १ लाख २४ हजार मते मिळाली खरी. मात्र आता पटोलेंच्या जागी भाजपचा उमेदवार कोण ? यासाठी मोठ्ठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
आमदार म्हणून विजयाची हॅटट्रिक करणा-या नाना पटोले यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधलीये. पटोले आता खासदार झाल्याने नव्या उमेदवाराला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीचा एकूणच रागरंग पाहता खासदार म्हणून निवडून गेलेल्या नाना पटोले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. कारण भाजपच्या नव्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबादारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.