यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघ. यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळमध्ये होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा कौल हे येथील खास वैशिष्ट्य.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी सुरुवातीच्या काळात अपक्ष निवडणुका जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर सातत्याने काँग्रेस विजयी होत आली मात्र १९९५ मध्ये भाजपचे राजाभाऊ ठाकरे यांनी मुसंडी मारली आणि १९९६, आणि २००४ मध्ये पुन्हा भाजप उमेदवाराला आमदारकीची खुर्ची मिळाली.
२00९ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढलेल्या काँग्रेसच्या नीलेश पारवेकरांनी हा मतदारसंघ भाजपाकडून खेचून घेतला. मात्र त्यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर 2013 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निलेश पारवेकरांच्या पत्नी नंदिनी पारवेकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या. भाजपचे माजी आमदार मदन येरावार यांचा त्यांनी १५२३३ मताधिक्याने पराभव केला. नंदिनी पारवेकर यांना ६२५०९, तर भाजपच्या मदन येरावार यांना ४७२७६ मतं मिळाली.
आमदारांची कामे :
रस्त्याचे चौपदरीकरण करून हायमास्ट दिव्यांची व्यवस्था, पोस्टल ग्राउंड आणि आझाद मैदानाच्या सुशोभिकरणाला मंजुरी , पूर संरक्षक भिंती , लोहारा येथे पाणी पुरवठा योजना, २ वर्षात तब्बल ३५ कोटी रुपयांचीची कामे मंजूर केल्याचं पारवेकर सांगतात.
पारवेकर दाम्पत्यांनी विकासासाठी भरपूर निधी आणला असल्याचे दावे केले असले तरी आमदार निधी खर्चा व्यतिरिक्त मतदारसंघात ठोस आणि मुलभूत कामे कुठलीच झाली नसल्याची टीका विरोधक करताहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांना यवतमाळ मधून तब्बल २८३८८ मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे भाजपतर्फे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. तर काँग्रेसच्या वाट्याचा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
काय आहेत समस्या...
जिल्हा रुग्णालयात असुविधांचा कळस दिसतो., एमआयडीसी क्षेत्रात उद्योगांची वाणवा आहे., शहरात पार्किंगची व्यवस्थाच नाही., ग्रामीण आणि शहरी भागातही रस्त्यांची दुरवस्था आहे.पाणीपुरवठ्याच्या निळोणा धरणाकडे दुर्लक्ष आणि पर्यायी उपाययोजना नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
काँग्रेसच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याविषयीही अनेक तर्कवितर्क लढवले जातायेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पूत्र राहुलसाठी यवतमाळ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलंय. परंपरागत दिग्रस-दारव्हा मतदारसंघात शिवसेनेचे नेटवर्क तोडण्यात गेल्या पाच वर्षात यश न आल्याने ठाकरे पिता-पुत्रांनी आता आपला मोर्चा यवतमाळकडे हलवल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.