जिल्हा बँक निवडणुकीत बदलली राजकीय समीकरणं...

राज्यात आज ठिकठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Updated: May 5, 2015, 08:23 PM IST
जिल्हा बँक निवडणुकीत बदलली राजकीय समीकरणं... title=

मुंबई : राज्यात आज ठिकठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

जिल्हा बँकेची नाळ ग्रामीण जनतेशी जोडलेली असते. त्याद्वारे व्होट बँकेचे राजकारण आणि मोठा आर्थिक स्त्रोत असलेल्या बँकेवर आपलीच पकड ठेवण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशिल आहेत. जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे तसेच  राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील, अहमदनगरमध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, तळकोकणात नारायण राणे, रत्नागिरीत शिवसेना आमदार उदय सामंत, बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलीय.
 
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीही आज मतदान पार पडलं. बँकेतल्या २१ जागांपैकी ६ जागा बिनविरोध आल्या असून उर्वरीत १५ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड मैदानात असून विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा विकास आघाडी, भाजपा आणि सेना यांची या निवडणुकीत आघाडी आहे. त्यामुळे नगरच्या जिल्हा बँक निवडणूकीत चूरस निर्माण झालीय.
 
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट आणि भारतीय जनता महायुती झाली असून या महायुतीच्या विरोधात राष्ट्रवादिच्याच दुस-या गटाने शड्डू ठोकला आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. जिल्हा बँकेच्या १४ जागांसाठी आज मतदान झालं. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासोबत महायुती केली आहे. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके या नेत्यांनी विरोधात पॅनल उभा केला आहे. पंकजा यांच्या महायुतीचे पाच उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पक्षविरहित राजकारण करावे लागते त्यामुळेच आपण महायुतीचा प्रयोग राबवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेतल्याचा दावा पंकजा यांनी केलाय.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या १५ जागांसाठी मतदान झालंय. महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. खडसे याचं सर्वपक्षीय सहकार पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकमान्य शेतकरी पॅनलमध्ये ही लढत आहे. २१ जागांपैकी खडसेंच्या पॅनलचे पाच तर राष्ट्रवादीच्या पेनलची एक जागा बिनविरोध आलीय. एकूण २८५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार ए.टी. पाटील, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर रिंगणात आहेत.
 
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकूण २१ जागा आहेत. यापैकी एक जागा बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे एकूण २० जागांसाठी निवडणूक झाली. २० जागंसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ११८९ मतदार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप यांचं सहकार पँनल तर शिवसेनेचं शिवसंकल्प पॅनल यांच्यामध्ये ही लढत आहे. दोन्ही पँनेलचे प्रत्येकी २० उमेदवार रिंगणात आहेत. तर ४ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहे.. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आपलीच सत्ता येईल, असा दावा दोन्ही पँनलचे नेते तसेच उमेदवारांनी केलाय..  

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेस–राष्ट्रवादीच्या पॅनलची भाजप-शिवसनेच्या पॅनलविरोधात सरळ लढत होतेय. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना-भाजप असा सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. सहा महिन्यांत दोनदा विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या राणेंच्या जिल्ह्यातल्या अस्तित्वाचा फैसला या निवडणुकीनं होणार आहे.

आज राज्यातल्या अनेक जिल्हा सहकारी बँकांमध्ये मतदान सुरू असताना राजकीय समीकरणं बदलल्याचं दिसतंय. अवघ्या ६ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधत उभे ठाकलेले दिग्गज जिल्ह्यातल्या राजकारणात मात्र एकत्र आलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.