आता बोंबला... शेतकरी गेले संपावर!

जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत. 

Updated: Jul 12, 2014, 01:24 PM IST
आता बोंबला... शेतकरी गेले संपावर! title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत. 

समाजातले अनेक नोकरदार संपावर गेलेले तुम्ही पाहीलं अनुभवलं असेल... पण, शेतकरी संपावर गेल्याचं कधी ऐकलंय... नाही ना...? पण हा प्रकार घडलाय. आपला अन्नदाता शेतकरी संपावर गेला तर काय होईल याचा विचारही करवत नाही ना...? 

दुष्काळ पडतो, गारपीट होते, अवकाळी पाऊस पडतो... कधी नको इतका पाऊस पडतो.. प्रत्येक वेळी बळी जातो तो बळीराजा.. मग कागदी घोडे नाचतात... पॅकेजेसचं गाजर दाखवलं जातं... पंचनामे होतात.. शेतकऱ्याला मात्र यातून काहीच मिळत नाही. अस्मानी संकटापेक्षाही सुलतानी संकट भयानक असतं.. पाणी असून वीज नाही, पिकांना हमीभाव नाही, गारपिटीच्या नुकसानीचे बोगस पंचनामे, पंचनाम्यातले भ्रष्टाचार.. शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करणारं सरकारी धोरण... या सगळ्यालाच कंटाळलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या 200 शेतकऱ्यांनी अखेर संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
 
या संपाचं लोण आता सात गावांत पसरलंय. 200 वरून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारावर गेलीय. पण, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय... टाकुयात एक नजर...  
 -    नुकसान झाल्यास त्याच दिवशी पंचनामे करावेत.
-    शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी 
-    पीक नुकसान भरपाई त्वरित द्यावी 
-    ठिबक सिंचन अनुदान सहा महिन्यात मिळावे, त्याची तपासणी दोन महिन्यात व्हावी
-    बाजारभाव कमी असल्यास हमी भावाने शेतमालाची खरेदी करावी 
-    नद्यांवर लहान लहान बंधारे बांधून अवैध वाळू उपसा थांबवावा 
-    शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी 
-    पीक विम्याबाबत स्वतंत्र विभाग सुरु करावा. 
 
शेतकऱ्यांच्या या मागण्या अजिबातच अवास्तव नाहीत. सरकारनं थोडीशी इच्छाशक्ती दाखवली तर त्या सहज पूर्ण होऊ शकतात. पण मुद्दा इच्छाशक्तीचा आहे. बळीराजाला जगवण्याची सरकारची खरच इच्छा आहे का? हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. 

जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संप सुरू करून सरकारला आपल्या एकीच्या बळाची जाणीव करून दिलीय. तातडीने त्यांची दखल घ्या...  नाही तर हे लोण राज्यभर पसरलं तर आपल्या दोन वेळच्या जेवणाचे वांदे होतील लक्षात ठेवा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.