अनधिकृत बांधकामावर कारवाई; अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल

अनधिकृत  बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. 

Updated: Sep 23, 2014, 11:32 PM IST
अनधिकृत बांधकामावर कारवाई; अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल title=
प्रातिनिधिक फोटो

कल्याण : अनधिकृत  बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकातील अधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेल फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. 

कल्याण पूर्वेतील कचोरे येथील नवीन गोविंदवाडी इथली ही घटना...  इथल्या भूखंडावर जोमाने सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे.

मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास  सहाय्यक आयुक्त  कृष्णा लेंडेकर आणि पालिका कर्मचारी, पोलीस पथकासह कारवाई करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी रहिवाशी बशीर शेख यांच्या घरावर कारवाई सुरु असताना या पथकाला संतप्त जमावाने घेराव घातला.

याच बाचाबाची दरम्यान रहिवासी बशीर शेख याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत  सहाय्यक आयुक्तांच्या अंगावरही रॉकेल ओतले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियत्रणात आणली.

याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बशीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी दिलेत.

‘घर वाचवण्यासाठी लाचही दिली होती...’
दरम्यान, बशीर शेख यांनी मला घरावर कारवाईबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. तसंच घर अनधिकृत असलं तरी यावर कारवाई होऊ नये, यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आणि मध्यस्थांना लाखो रुपये दिल्याचा आरोप शेख यांनी केलाय. 

आपल्या घरावर कारवाई झाल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो असून दुसरा पर्याय नसल्यानं स्वत:ला संपविण्यासाठी स्वताच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत उपस्थित अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल उडाले असेल, जाणून बुजून अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल टाकले नाही, असं शेख यांनी म्हटलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.