नागपूर : सुनो बलवाइयों, आपका जमाव गैरकानूनी है.. आप लोग यहाँ से चले जाव... नहीं तो आप पर पक्की गोली चलाई जाएँगी... चले जाव। चले जाव। चले जाव । '' असा मजकूर चक्क नागपूर पोलिसांनी एका फलकावर लिहिला आहे.
नागपूरमध्ये हे राम नथूराम या नाटकाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना दंगल नियंत्रण पथकाने हा फलक दाखवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने या नाटकाला विरोध करण्यासाठी देशपांडे नाट्यगृहाबाहेर आंदोलनं केली.
शांततेच्या मार्गाने निदर्शनं सुरू होती. मात्र त्याचवेळी आंदोलकांना थेट गोळीबाराची इशारावजा धमकीच दंगल नियंत्रण पथकानं दिल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी निदर्शनं करताना कोणताही हिंसक प्रकार केलेला नाही. एखाद्या गोष्टीविरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला अधिकार असतानाही पोलिसांच्या या फलकानं प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे.
एवढा वाद झाल्यानंतरही पोलिसांनी मात्र मौन बाळगणंच पसंत केलं आहे. भारतीय दंड विधानाच्या 129 नुसार पाचपेक्षा जास्त मंडळी एकाच ठिकाणी जमली असतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहीला असेल तर लाऊड स्पीकरवरून माहिती देऊन अटक कारवाई करता येते.
कलम 130 नुसार जमाव उपद्रवकारी असेल तर बळाचा वापर करता येतो. कमीत कमी इजा पोहोचेल असा पाण्याचा मारा, अश्रूधुराचा मारा या साधनांचा वापर करता येतो. पक्क्या गोळीचा वापर करता येतो तोही पायावर पण यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची आवश्यकता असते.