त्यांनी दिला आपल्या आईचाच बळी, दोघे भाऊ ताब्यात

ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष इथल्या एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकानं आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

Updated: Dec 30, 2014, 07:28 PM IST
त्यांनी दिला आपल्या आईचाच बळी, दोघे भाऊ ताब्यात title=

घोटी, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काशिनाथ आणि गोविंद दोरे यांनी सुख लाभत नसल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील टाके हर्ष इथल्या एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकानं आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे.

घोटी पोलिसांनी याप्रकरणी दोरे बंधू आणि त्यांना मांत्रिकाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतलं आहे. महिला मांत्रिक फरार झाली आहे. तिचं नाव कळू शकलेलं नाही.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावाजवळ एका महिला मांत्रिकानं एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना कळविलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी चौकशी केल्यानंतर मंदिर बांधणीच्या नावाखाली महिला मांत्रिकाला सात बळी द्यायचे होते. तिनं दोन महिलांचा बळी दिला असून एका महिलेनं तिच्या तावडीतून सुटका केल्यानं ती बचावल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय.

ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दांडवळ इथल्या काशिनाथ आणि गोविंद दोरे यांची बहीण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष इथं राहते. आपल्याला सुख मिळत नसल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं. तिनं गावातील एका महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी महिला मांत्रिकासमोर व्यथा मांडल्यानंतर तिनं तुझी आई आणि बहीण चेटकीण असल्यानं तुम्हाला सुख लाभत नसून दोघींचा बळी द्यावा लागेल, असं सांगितले. काशिनाथ आणि गोविंद यांनी दिवाळीत त्यांची आई बुधीबाई पुना दोरे आणि बहीण राहीबाई पिंगळे यांना तिच्याकडे आणलं. तिनं दोघींना बेदम मारहाण केली आणि बुधीबाई हिचे डोळे काढले. त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र राहीबाई पिंगळे हिनं प्रसंगावधान राखत पळ काढला. मात्र महिला मांत्रिकानं बुगीबाई वीर हिचा बळी दिल्याचं पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झालंय.  

पोलिसांनी सोमवारी राहीबाईला ताब्यात घेतलं. तिनं घटनेची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी काशिनाथ आणि गोविंद दोरे यांना ताब्यात घेतलं. पोलीस बुधाबाई यांचा पुरलेला मृतदेह मंगळवारी काढणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.