औरंगाबाद : पोलीस भरतीत उमेदवाराऐवजी पोलीस शिपायानेच लेखी परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे निवड यादीत संबधित उमेदवार मेरिटमध्ये आला आहे.
या फसवणूक प्रकरणी शिपायासह, पास उमेदवाराला ताब्यात घेण्यात आले आहे. उमेदवाराचे नाव छोटी राम भोप असून शिपायाचे नाव मंजतसिंग सिंगल आहे. शिपायाने यासाठी सात लाख रुपये घेतले आहेत.
जिल्हा ग्रामीण पोलिस विभागासाठी शिपाईपदाच्या २१५ जागांसाठी सहा जूनपासून भरती सुरु होती. त्यासाठी ९ हजार ४२ पुरुष तर, ९४९ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते.
मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या २ हजार ८०० उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जूनला झाली. इतर उमेदवाराप्रमाणे छोटी राम भोप यानेही अर्ज केला होता.
मैदानी चाचणीत तो पास झाला, परंतु लेखी परीक्षेत पास होण्याची शक्यता त्यास नव्हती. त्यामुळे त्याने शहर पोलिस आयुक्तालय पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या मंजतसिंग सिंगल याची मदत घेतली.
छोटी राम ऐवजी मंजतसिंगने परीक्षा दिली मात्र एका निनावीपत्रामुळे ही फसवेगिरी उघड झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मैदानी तसेच लेखी परीक्षेतील सर्व व्हिडिओ फुटेज तपासले. त्यात फसवेगिरी झाल्याचे उघड झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.