मुंबई : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी मुंबईतल्या धारावीत काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत अनेक मोर्चेकरी जखमी झाले.
'नॅशनलिस्ट फोरम पार्टी'च्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धारावीतून हा मोर्चा जात असताना काही अज्ञातांनी मोर्चेकरांवर हल्ला केला.
हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेनंतर स्थानिक भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या हल्ल्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप फेटाळून लावला. या मोर्चाच्या माध्यमातूनच संघाच्या कार्यालयावर हल्ला करण्याची योजना होती असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
या हल्ल्यात संघाचे 4 कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी याप्रकरणी 15 अज्ञातांविरोधात मारहाण आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.