मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केलीय.
दरम्यान, राज्यातील शेतकरी अक्षरश: अडचणीत आलाय. शेतीमालाला दर नाही, सरकार मदत करायला तयार नाही. त्यामुळे राज्यात गेल्या दोन वर्षात 9500 हून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. अशा परिस्थितीत शेतक-यांची चेष्टा करू नका, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दानवेंवर केली.
तूर, ऊस, बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलंय. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. एवढंच नव्हे तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही रडारड सुरूच असल्याचं सांगत अर्वाच्य शब्दात शेतक-यांची अवहेलना केली.
दानवेंच्या मनात शेतक-यांबाबत कमालीचा राग असल्याचंच त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आलं. शेतक-यांबाबत यापुढे प्रश्न ही विचारू नका असा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना भरला. दानवेसाहेब शेतक-यांना न्याय देता येत नसेल तर निदान शिव्या तरी देऊ नका, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.