बारामती, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौऱ्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या गाडीतून सैर करून आणली. तर बारामतीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी काकांनाच चिमटा काढला. काय घडलं नेमकं या दौ-यात?
आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... भाजपचे बडे नेते सध्या बारामतीत जाऊन पवारांचा पाहुणचार घेतायत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीत बारामतीकरांचं निमंत्रण हा वादाचा मुद्दा ठरला होता.
अधिक वाचा : मोदी, जेटलीनंतर मुख्यमंत्री बारामतीच्या प्रेमात
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बारामतीचं निमंत्रण धुडकावलं. याउलट मुख्यमंत्र्यांनी मात्र कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषी प्रदर्शनाला शुक्रवारी हजेरी लावली. मात्र पवारांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी बारामतीकरांनाच चिमटा काढला.
तर शरद पवारांनीही ऐन सणासुदीला भडकलेल्या तुरडाळीची आठवण करून देऊन, मुख्यमंत्र्यांना प्रतिटोला लगावला. नाशिक, नगरचं पाणी मराठवाड्याला देण्यास होणारा विरोध चुकीचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कृषी विकास प्रतिष्ठानसारख्या दहा संस्था जरी आपण उभारु शकलो तरी महाराष्ट्राच्या शेतीचा विकास करता येईल, अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी प्रतिष्ठानचं कौतुक केलं.
भाजप आणि बारामतीच्या काकांमधील हे वाढतं प्रेम शिवसेनेला मानवणार का, याबाबत शिवसेना आता काय प्रतिक्रिया देते, याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.