कोल्हापूर : शिवसेना आणि भाजप हे सत्तेला चिकटलेले मुंगळे आहेत. हे दोघं वाद घालतील पण घटस्फोट कोणीही घेणार नाही, असं पवार म्हणाले आहेत. राज्यातल्या शिवसेना आणि भाजप सरकारवर टीका करत असताना पवारांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.
भारतानं एनएसजी सदस्य व्हावं यासाठी मोदींनी जागतिक स्तरावर प्रयत्न केले, यात त्यांना अपयश आलं असलं तरी त्यांचे प्रयत्न चांगले होते, असं पवार म्हणाले आहेत. नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनीही एनएसजीसाठी प्रयत्न केले होते. एक-दोन देशांनी विरोध केल्यामुळे आपल्याला मागे राहावं लागलं. हे चित्र बदलणारं नसलं तरी मोदींचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.