बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता काबिज केलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने विशेषतः आमदार किसन कथोरे यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती.
मात्र भाजपला २० जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेनं ४७ पैकी २४ जागा जिंकत कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत सत्ता काबीज केली. विशेषतः या निवडणुकीच्या प्रचारा साठी बदलापूरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि विनोद तावडेंनी सभा घेतली तरीही बदलापूरकरांनी आपलं दान शिवसेनेच्या पारड्यात टाकलं.
२०१० च्या निवडणुकीत बदलापूरमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता होती. वामन म्हात्रे यांच्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रकारावरून इथे शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
वामन म्हात्रे यांनी अपक्षांच्या मदतीने नगराध्यक्षपद राखलं होतं. त्याला शह म्हणून भाजपने तेव्हा राष्ट्रवादीशी जुळवून घेत पुन्हा नगराध्यक्षपद मिळवलं. शिवसेना भाजप यांच्यातल्या या वादाची परिणती या निवडणुकीत झाली. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्या.
शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि भाजपचे किसन कथोरे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. त्यात शिवसेनेनं सत्तेचा घास भाजपकडून हिसकावून घेतला. कुळगाव बदलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने मात्र दणकून मार खाल्लाय. काँग्रेसला खातंही खोलता आलं नाही, तर राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.