विठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला देवाच्या दारातच मरण आलंय. 

Updated: Jun 25, 2016, 08:52 PM IST
विठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...  title=

सोलापूर : पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला वेळेवर उपचार न उपलब्ध झाल्यानं मंदिर परिसरातच आपले प्राण गमवावे लागलेत.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीय़. राजूबाई राजानी असं या महिलेचं नाव आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

राजूबाई या मुंबईतील उल्हासनगर इथल्या रहिवासी आहेत. ६० वर्षांच्या राजानी देवदर्शनासाठी शुक्रवारी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या होत्या. 

शनिवारी त्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्या अचानक खाली कोसळल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर उपचारांसाठी मंदिर प्रशासनाकडे मदत मागितली, मात्र त्यांच्या मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. परिणामी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

या घटनेनंतर जाग आलेल्या मंदिर प्रशासनाने पंढरपूर मंदिरात वैद्यकीय पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तातडीने रुग्णवाहिका खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.