पानसरेंवर हल्ला : शिवसेनेचा भाजपवर निशाणा

कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत शिवसेनेनं मंगळवारी महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व्यवस्थेवरून भाजप सरकारला धारेवर धरलंय.

Updated: Feb 17, 2015, 01:16 PM IST
पानसरेंवर हल्ला : शिवसेनेचा भाजपवर निशाणा  title=

मुंबई : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत शिवसेनेनं मंगळवारी महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व्यवस्थेवरून भाजप सरकारला धारेवर धरलंय.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये छापलेल्या एका संपादकीयमध्ये म्हटलं गेलंय...  'दाभोलकरांप्रमाणेच कॉ. पानसरे हेसुद्धा याबाबतीत ‘कडवट पुरोगामी’ असले तरी त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व अशाप्रकारे भ्याड हल्ले करून त्यांचे बोलण्या-लिहिण्याचे स्वातंत्र्य कुणाला नष्ट करता येणार नाही. दाभोलकरांवर पुण्यात हल्ला झाला तेव्हा ते ‘मॉर्निंग वॉक’साठी निघाले होते. आता गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यादेखील कोल्हापुरातील ‘सागर मळा’ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांच्यावर हल्ला झाला'

'दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते व दाभोलकरांच्या खुनावरून त्या सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले होते. आता दिवसाढवळ्या झालेल्या पानसरे यांच्यावरील निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत व गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते तर त्यांना याच शब्दांनी बेदम चोपले असते' असं म्हणत शिवसेनेनं सरळ सरळ भाजप सरकारवर ताशेरे ओढलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.